logo

कवयित्री स्वाती नातू यांच्या काव्यसंग्रह प्रकाशनाचा सोहळा संपन्न ...

वाचनालय ,कल्याण येथे कवयित्री स्वाती महेश नातू यांच्या काव्यदीप आणि मोहनानंद या दोन काव्य संग्रहांचे प्रकाशन सुप्रसिद्ध अभिनेते प्रमोद पवार आणि कवी गझलकार माधव डोळे यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्याण सार्वजनिक वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांनी केले. सदर प्रकाशन सोहळ्यास अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांतचे कार्याध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण देशमुख, प्रसिद्ध गझलकार वा.ना.सरदेसाई, ज्येष्ठ समीक्षक विजय चिपळूणकर, प्रज्ञावंत साहित्यिक तथा शारदासुत सुनील म्हसकर, ज्येष्ठ कवी यशवंत वैद्य, कवयित्री ऋता खापर्डे आदी अनेक नामवंत कवी व साहित्यिक यांची उपस्थिती होती.
यावेळी कवयित्री स्वाती नातू यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हटले की, "आईची इच्छा पूर्ण करण्याचा केलेला हा प्रयत्न म्हणून आई-वडील दोघांचे एकत्रित (मोहनानंद) नावं संग्रहाला दिले आहे. काव्यदीप तेवत रहावा यासाठी विजय चिपळूणकर व सुखदा कोरडे यांचे मार्गदर्शन लाभले आणि पती महेश नातू यांची मोलाची साथ लाभली."
कवी,गझलकार माधव डोळे यांनी स्वाती नातू यांच्या कवितेतून त्यांचे निसर्गावरचे प्रेम दिसून येते. तसेच भगवंताचे नाम,भक्ती आणि त्याद्वारे जीवनविषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो, असे विचार मांडले.
तर "एक नट काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाला कसा ?अशी सुरवात करत काही गोष्टी ऋणानुबंधाच्या असतात", असे म्हणत सुप्रसिद्ध अभिनेते प्रमोद पवार यांनी नातू कुटुंबाविषयीची आपुलकी व्यक्त केली व स्वातीच्या स्वदीप्ती होण्याच्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता कुलकर्णी
यांनी केले. महेश नातू यांनी उपस्थितांचे आभार मानले. सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

0
110 views